डिटवाह चक्रीवादळाने रविवारी भारतात प्रवेश करायला सुरुवात केली. त्याच्या प्रभावामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारपर्यंत हे शक्तिशाली वादळ तमिळनाडू आणि पुदुचेरीच्या किनाऱ्यापासून ५० किलोमीटर दूर डिप-डिप्रेशनमध्ये होत आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत, उत्तर भारतात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. पंजाबपासून दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागांमध्ये किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे. थंडीचा हा वाढलेला जोर नागरिकांना दिवसाही जाणवत आहे.
advertisement
या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. महाराष्ट्रात उत्तरेला पुढचे 48 तास 3 डिग्रीने आणखी पारा घसरणार आहे. त्यानंतर तापमानात कोणताही बदल होणार नाही. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. 1 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येणार आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेत थंडीची लाट येणार आहे. 3 ते 6 डिसेंबर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ वातावरण राहू शकतं. मात्र रात्री पुन्हा कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात यंदा थंडी वाढताना दिसत आहे. तसंच ला निनाचा इफेक्टही पाहायला मिळू शकतो. त्यामुळे थंडीचा जोर दोन महिने राहणार आहे.
राज्याच्या काही भागांसाठी कडाक्याच्या थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे आज किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील २४ तास वातावरण स्थिर राहील. त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये मात्र तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून, थंडीचा जोर २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
