समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता आहे. वैभव मोहोड ( ३० वर्षे) असे तरूणाचं नाव आहे. वैभवचे लग्न अवघ्या काही तासांवर ठेपले असताना त्याच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्ताने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव मोहोड याचे वडील हरिभाऊ मोहोड यांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
वडिलांनी थेट पोलिस स्थानक गाठले
वैभव शिवाजी महाविद्यालयातलिपिक म्हणून कार्यरत होता. मंगळवारी (१३ मे) सकाळी सामान आणायला बाहेर जातो, असं सांगून घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ झाला तरी वैभव घरी परतला नाही, त्याच्याशी संपर्क देखील झाला नाही. वैभव घरी परत न आल्याने वडिलांनी थेट पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मिसिंगची नोंद
बेपत्ता झालेल्या वैभव याने सकाळीच एटीएम मधून 40 हजार रुपये काढले होते. तसेच घरातून बाहेर पडताना सोबत ९० हजार रूपये नेल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे. पोलिसांनी मिसिंगची नोंद घेतली आहे.
कोण आहेत हरिभाऊ मोहोड?
हरिभाऊ मोहोड हे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांची ओळख आहे. ऐन लग्नाच्या एक दिवस अगोदर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
