मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि विद्यमान काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभेसाठी काँग्रेसने ज्या उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात नाव नसल्याने नाराज झालेल्या झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांनी हातात घड्याळ बांधलं.
advertisement
काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत झिशान सिद्दीकी यांचं नाव नाही. झिशान सिद्दीकी यांच्यासोबत इतर काही नेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यात संजय काका पाटील, निशिकांत पाटील आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश आहे. निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून ते जयंत पाटलांविरोधात मैदानात उतरतील.
अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश पार पडले. यावेळी अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना एबी फॉर्म दिला. इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर वांद्रे पूर्मवधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का, समीर भुजबळ अपक्ष लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नांदगावमधून गणेश धात्रक यांना तिकीट दिलं आहे, त्यामुळे नांदगावमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
