महिन्यात दुसऱ्यांदा काँग्रेसला नवसंजीवनी
गेल्या महिन्यात नगर परिषद निवडणूक निकालांत काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले होते. गेल्या महिन्यात राज्यातील ३७ नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष बसले. आताही जवळपास तीन महापालिकांत काँग्रेसचा महापौर बसणार आहे. एका महिन्यात काँग्रेसला दुसऱ्यांदा नवसंजीवनी मिळाली आहे.
चंद्रपूर, लातूर आणि भिवंडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने तेथील महापालिकांत काँग्रेसचा महापौर बसेल. तसेच परभणीत शिवसेना ठाकरे गटाच्या साथीने काँग्रेस महापालिकेत सत्तेत बसेल. काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
पाच शहरात काँग्रेसचा महापौर, ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत, सपकाळांचा दावा
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. तीन शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
संक्रातीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस राज्यात दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. जेथे शक्य आहे तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षाने वैचारिक व संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली. सत्ताधारी भाजपा महायुतीने पैशाचा प्रचंड वापर केला, बोगस मतदान झाले, कुठलीही तडजोड न करता भाजपाच्या बुलडोझरसमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्यांचा विजय असून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे, विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. हा काळ संघर्षाचा, वैचारिक लढाईचा आहे आणि काँग्रेस ही लढाई लढण्यास कटीबद्ध आहे. अपशाने खचून न जाता पुढच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे
मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्रि अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले. हुकमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे असा इशारा सपकाळ यांनी दिला.
