या संदर्भात पक्षकाराच्या वतीने ॲड. राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, काही कैद्यांना धर्मपरिवर्तनासाठी प्रलोभन दाखवण्यात आले. यामध्ये तीन कैद्यांचा समावेश असून, त्यांना धर्म बदलल्यास गुन्ह्यातून मुक्तता मिळेल अशा स्वरूपाची आमिषे दाखवण्यात आली.
मोठी खळबळ उडाली
advertisement
याशिवाय, कारागृहातील संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे देखील हटविण्यात आल्याचा गंभीर आरोपही आघाव यांनी केला. या संदर्भात त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना आघाव यांनी स्पष्ट केले की, या प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, तर कैद्यांच्या मनोबलावरही परिणाम झाला आहे. जिल्हा कारागृह ही सुधारगृहासारखी वागणूक मिळण्याची जागा असताना येथे धर्मपरिवर्तनाचे प्रलोभन दाखवले जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लवकरच औपचारिक तक्रार दाखल करण्यात येईल. हा प्रकार फक्त कैद्यांपुरता मर्यादित नसून समाजातील सर्वसामान्यांच्या भावनांशी निगडित आहे. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
आरोपांमुळे प्रशासनावर मोठे दबाव
या प्रकरणानंतर बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वीही या कारागृहातून विविध गैरप्रकार समोर आले होते. आता धर्मपरिवर्तनाच्या आमिषांबाबतच्या आरोपांमुळे प्रशासनावर मोठे दबाव निर्माण झाले आहे. या प्रकरणात कारागृह अधीक्षकांची भूमिका काय होती आणि खरोखरच कैद्यांना प्रलोभन दाखवले गेले का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या सर्व घडामोडींमुळे बीड जिल्हा कारागृह व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.