या चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेली प्रणाली 25 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 27,28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. 26 ऑक्टोबरपासून मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावर अधिक परिणाम
advertisement
या दोन हवामान प्रणालींचा एकत्रित प्रभाव महाराष्ट्रावर दिसून येईल. यामुळे कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांचे दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार सरी अपेक्षित आहेत. मुंबई, गोवा आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांतही ढगाळ वातावरण राहून, विजांच्या कडकडाटासह मान्सूननंतरचा पाऊस हजेरी लावू शकतो.
२६ ऑक्टोबरला पाऊस आणखी वाढणार
२६ ऑक्टोबर: अरबी समुद्रातील प्रणाली उत्तरेकडे सरकत असल्याने गुजरातच्या सौराष्ट्र किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहील. दक्षिण मराठवाडा-विदर्भ: तेलंगणा आणि छत्तीसगडला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या भागांतही पावसाची शक्यता आहे.
उत्तराकडून गारठा येण्यास सुरुवात
राज्याच्या पावसाळी वातावरणादरम्यान, उत्तर भारतातून थंड वारे येण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (२५ ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत रात्री आणि पहाटे थंडी जाणवायला सुरुवात होईल. २७ ऑक्टोबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीसाठी तयार असलेली पिके (कापूस, सोयाबीन) आणि रब्बी हंगामातील पिकांची पेरणी यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित स्थळी ठेवावीत, तसेच फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
