मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक एक मधील फुलेनगर येथील मतदान केंद्रात बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत एका महिलेला आणि एका पुरुषाला मारहाण करण्यात आली. रचीता गौड जंगमपल्ली असं पीडित महिलेचं नाव आहे. मारहाण करण्यात आलेल्या रचिता या भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनिता गौड जंगमपल्ली यांची मुलगी आहे.
advertisement
आपण धर्माबाद येथील मतदार असून मतदान देखिल केलं. मात्र मतदान केंद्रात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण आपल्याला केली, असा आरोप रचिता यांनी केली. नंतर मुख्य रस्त्यावर आणून देखील रचिता आणि अन्य एका पुरुषाला मारहाण करण्यात आली.
पत्रकारांनाही धक्काबुक्की
विशेष म्हणजे, मतदान केंद्रामध्ये पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांसमक्ष मारहाण होत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होतो. नंतर आलेल्या पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. यावेळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना मज्जाव करत पोलिसांनी पत्रकारांना देखील धक्काबक्की केली. दरम्यान, रचिता गौड जंगमपल्ली यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितलं.
