देवेंद्र फडणवीस हे बुधवारी छत्रपती संभाजीनगरला आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज्याचे नवे सरकार, मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार, नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होतील, याबद्दल प्रश्न विचारले. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्याआधी फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि नव्या मंत्रिमंडळावर स्पष्टपणे भाष्य केले. यावेळी त्यांच्यासोबत अतुल सावे आणि स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.
advertisement
मुख्यमंत्री कोण होणार?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीत कोणतेही वाद नाहीत. आमच्या मित्रपक्षांशी आमचे प्रमुख नेते दिल्लीत चर्चा करीत आहेत. शेवटी चर्चेला वेळ लागतोच. आधी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल. हा निर्णय तुम्हाला कळेलच, जरा संयम ठेवायला हवा, असे फडणवीस म्हणाले.
नव्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार?
तसेच नव्या सरकारमधील मंत्र्यांबाबत प्रश्न विचारले असता, आधी मुख्यमंत्री ठरू द्या. मग नवे मुख्यमंत्री आपल्या सरकारमध्ये कुणाकुणाला मंत्री करायचे, याचा निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.
विरोधकांचा ईव्हीएमवर संशय, आपली भूमिका काय?
विरोधकांच्या ईव्हीएमवरील शंकेबाबत विचारले असता, जिंकले तर संशय नसतो आणि हरले की लगेच संशयाला सुरुवात होते, हे त्यांचे नेहमीचे वर्तन राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या भूमिकेला मंगळवारी चपराक दिली आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणं उचित नाही, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्रिपद नाही पण केंद्रात मंत्री किंवा उपमुख्यमंत्री व्हा, भाजपची एकनाथ शिंदे यांना ऑफर
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडण्यास स्पष्टपणे नकार देताना एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे तर एकनाथ शिंदे यांनी राज्यात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असे भाजपकडून कळविण्यात आले आहे. अशा दोन ऑफर शिंदे यांना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे दुपारी तीन वाजता कोणता निर्णय जाहीर करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
