नागपूर : भाजपच्या नागपूर जिल्ह्याच्या अधिवेशनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिले आहेत ज्यांनी सातत्याने तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भुषवलं आहे. लोकसभेत काही अंशी निराशा आली, आपल्यापेक्षा केवळ 2 लाख मतं जास्त त्यांना मिळाली आहेत. 3 टक्के फरकाने आपण 12 जागा हरल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
advertisement
'महाराष्ट्रात आपली लढाई यंदाही चौथ्या पक्षाशी म्हणजे फेक नरेटिव्हसोबत होती. दुर्दैवाने आपण इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही. महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये औकात नव्हती. लोकांच विश्वास त्यांच्यावर नाही. बाजार बुडगे आणि कथित विचारवंत यांनी फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी टोळी तयार केली. दलित समाज, मुस्लिम समाज, शेतकरी यांच्यात फेक नरेटिव्ह पसरवले. फेक नरेटिव्हला फेक नरेटिव्हने उत्तर देण्याचं ठरवलं आहे', असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
अनिल देशमुखांवर हल्ला
अनिल देशमुखांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्या म्हणत पोस्टर काढलं आणि त्याखाली लिहलं की ही योजना फक्त तीन महिन्यांसाठीच आहे. महिला आघाडीने उत्तर दिलं पाहिजे. तुमच्यासारखे आम्ही चोर नाही. जो शब्द लाडक्या बहिणींना दिला तो शब्द मोडला जाणार नाही. शेतकरी महिला असो, मोफत वीज देत आहे. कापड उत्पादकांना अनुदान देणार आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
अनिल देशमुखांना आरोप करून सहानुभूती मिळवायची आहे, या लोकांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्या आरोपावर मी बोलणं हा मी माझा कमीपणा समजतो पण नागपूर जिल्ह्याच्या लोकांना माहिती पाहिजे म्हणून मी बोलतो, यांचा खरा चेहरा दिसला पाहिजे, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.
शरद पवारांवर पलटवार
'लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न शरद पवार विचारतात. त्यांनी पहिले राहुल गांधींना विचारावं, खटाखट साडेआठ हजार रुपये तुम्ही देऊ शकता तर आम्ही 1500 का नाही? त्यांच्याकडे काय झाडाला पैसे लागले का लॉटरी लागली? का अमेरिकेच्या बँकेवर डल्ला मारला', असा पलटवार फडणवीसांनी केला आहे.
'आपण 100 किमीचा रस्ता बांधला असल तरी त्यावर बोलत नाही. मात्र त्यांच्याकडे एक किमीचा रस्ता बांधला त्याचं मार्केटिंग करून बोलतात. आत्मविश्वासाने आपले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याकडे अलिकडे चमकेश कार्यकर्ते तयार झाले आहेत. कॅमेरा दिसला की पुढे, नंतर माहिती पडत नाही कुठे असतात. कोण चमकेश कोण करा हे आम्हाला समजतं', असं म्हणत फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांचेही कान टोचले.
सुनिल केदार यांच्यावर निशाणा
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सुनिल केदार यांच्यावरही निशाणा साधला आहे. सावनेर विधानसभेवर महायुतीचा भगवा फडकेल, जिल्हा बँकेत 22 वर्षांपूर्वी घोटाळा झाला. कोर्टाने त्यांना शिक्षा केली, पण ते सांगतात भाजपने माझ्याविरोधात कट केला. नागपूर जिल्ह्याची बँक संपली. नागपूर जिल्ह्याची बँक जिवंत असती. पुणे, सातारा जिल्हा बँकेच्या पुढे नागपूरची बँक नेली असती, अशी टीका फडणवीसांनी सुनिल केदार यांच्यावर केली.
'सकाळचा भोंगा सुरू होतो, राष्ट्रवादीचे तीन लोक बोलतात, त्या ताई बोलतात. काँग्रेसचे तीन लोक बोलतात. सकाळपासून 9-10 लोक फक्त माझ्यावर बोलतात. देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं जात नाही तोपर्यंत निवडून येता येत नाही. हे त्यांना माहिती आहे. माझी शक्ती काय आहे, हे अधोरेखित करण्याचं काम ते करतात, पण देवेंद्र फडणवीसची ताकद हजारो कार्यकर्ते आहेत. अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं माहिती नव्हतं, पण कितीही चक्रव्यूह आली तरी ती कशी भेदायची हे मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे', असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.