समाजसेवेच्या माध्यमातून गावाचा गाडा हाकणारे सरपंच संतोष देशमुख यांची गतसाली ९ डिसेंबर रोजी अपहरण करून अमानुष हत्या करण्यात आली. त्यांना मारताना मारेकऱ्यांनी क्रौर्याची परिसीमा पार केली. देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्यासह अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली. देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाले तरीही अजूनही आरोप निश्चित करण्यात आलेली आहे. देशमुख कुटुंब अजूनही न्यायासाठी लढते आहे.
advertisement
देशमुख कुटुंबीय भावुक
तिथीनुसार संतोष देशमुख यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आज सकाळी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी संतोष देशमुख यांच्याविषयी आठवणी सर्व कुटुंबियांना दाटून आल्या होत्या. काही वेळ वातावरण अतिशय भावनिक झाले होते. धनंजय देशमुख भावाच्या आठवणीत ढसाढसा रडले. वैभवीने काकांना धीर देताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले.
सरपंच देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनीही उपस्थिती लावली.
अण्णावर जीवापल्ल्याड प्रेम करायचो...
आमचा निष्पाप माणूस या क्रूरकर्मी लोकांनी कायमचा हिरावून नेला. मी माझ्या भावावर जीवापल्ल्याड प्रेम करायचो. आमचं हसतं खेळतं कुटुंब होतं, आमच्या गरजा खूप कमी होत्या. पण हैवानांनी आमचा निष्पाप भाऊ मारला, असे सांगताना धनंजय देशमुख हुंदक्यांनी दाटले.
वडिलांना न्याय मिळावा- वैभवी देशमुख
बाबा जाऊन एक वर्ष झाले. अजूनही त्यातील एका आरोपीला अटक झालेली नाही. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी वैभवीने सरकारकडे केली.
