फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने मानसिक छळ आणि शारीरिक अत्याचाराला कंटाळून आपले जीवन संपवले. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र डॉक्टर महिलेने लिहिलेल्या पत्रात माजी खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गंभीर आरोप केले. आरोपी रुग्णांचे तंदुरुस्ती अहवाल बदण्यासाठी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाचे वारंवार फोन यायचे, असे मृत डॉक्टरने पत्रात लिहिले होते. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी साताऱ्याच्या माजी खासदारांचे नाव न घेता त्यांच्याकडून ऊस कामगार आणि मुकादम यांची होणारी पिळवणूक आणि या प्रकरणात महिला डॉक्टरवर वारंवार असलेला दबाव हा मुद्दा अधोरेखित केला.
advertisement
मुकादमाला मारहाण, नंतर रुग्णालयात दाखल न करून घेता तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी डॉक्टरवर दबाव
गरकळ नावाचे मुकादम आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर माजी खासदारांच्या कारखान्यावर आहेत. त्यांची काही बाकी शिल्लक होती. यावरून काहीसा वाद झाल्याने गरकळ यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना काहीही झाले नाही, ते पूर्णपणे तंदुरुस्त (फिट) आहेत, यासाठी मृत महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला. खासदारांच्या स्वीय सहाय्यकाने महिला डॉक्टरला अनेक वेळा फोन केले, असे सांगत संबंधित गरकळ नावाच्या मुकादमांना धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर आणले. ऊसतोड मुकादमाला समोर आणून मुंडेंनी सातारा जिल्ह्यात असलेल्या कारखान्याकडून होणारी पिळवणूक समोर आणली.
शासनाला स्वस्थ बसू देणार नाही
ज्या खासदाराचा साखर कारखाना आहे, त्यांच्या स्वीय सहाय्यकाने डॉक्टरवर दबाव टाकला. आता मी शासनाला स्वस्थ बसू देणार नाही, मी मृत डॉक्टरला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
बीड जिल्ह्याची बदनामी काही पुढाऱ्यांनी केली
मागच्या प्रकरणात बीड जिल्ह्याची बदनामी जिल्ह्यातील काही पुढाऱ्यांनी केली. आपलेही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात पोटापाण्यासाठी काम करतात या गोष्टी कदाचित त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. मृत डॉक्टरला तू बीडची आहेस, तुमच्या बीडमधील लोक कसे गुन्हेगार असतात, यावरून तिला त्रास देण्यात आला. आज त्या पुढाऱ्यांनी विचार करावा, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सुरेश धस, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला.
