छत्रपती संभाजीनगर : आता सर्वांना आतुरता आहे बाप्पाच्या आगमनाची. 7 सप्टेंबरला घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होईल. गणेशोत्सव म्हटलं की, गणरायाचं साळस रूप, आरती, पूजा, प्रसन्न वातावरण आणि ढोल-ताशा पथक डोळ्यांसमोर येतात. बाप्पाच्या आगमनासाठी आता ढोल-ताशा पथकांची तयारी जोमात सुरू असेल. हे ढोल नेमके कितीला मिळतात माहितीये? बाजारात सर्वात फेमस ढोल कोणता आहे? याबाबत माहिती दिलीये ढोल विक्रेते शेख रफीक यांनी.
advertisement
ते म्हणाले, 'आम्ही वर्षभरापासून ढोल बनवायची तयारी करतो. कारण अनेक मंडळांकडून ढोल बनवण्यासाठी ऑर्डर येतात. आम्ही ढोलसाठी अत्यंत चांगला माल वापरतो जो मुंबई आणि गुजरातहून मागवला जातो. यावर्षी ढोलच्या किंमतीत 5 ते 7 टक्क्यांनी वाढ झालीये.
हेही वाचा : गणेशोत्सवात कोकणात जायला आणखी 20 स्पेशल गाड्या! आरक्षणाची तारीख जवळ
ढोल बनवण्यासाठी पत्रा, सलिया, दोरी आणि हुक लागतो. ढोलचा जो पत्रा असतो केवळ तोच आम्ही कारागिरांकडून बनवून घेतो. बाकीचा पूर्ण ढोल स्वतः तयार करतो. यात सिंगापुरी पत्रा वापरला जातो, जो चांगला आहे आणि त्याला मागणी मोठी असते. तसंच ढोलमध्ये जम्बो ढोल, मिनी ढोल, पुणेरी ढोल आणि ताशा असे प्रकार उपलब्ध आहेत.
सध्या बाजारात पुणेरी ढोलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इथं 500 रुपयांपासून 1700 ते 1800 रुपयांपर्यंत सर्व किंमतींचे ढोल मिळतात. मुलींसाठीही अत्यंत हलक्या वजनाचे ढोल मंडळांकडून खरेदी केले जातात. तसंच संपूर्ण मराठवाड्यात आम्ही ढोलचा पुरवठा करतो, असं विक्रेते शेख रफीक यांनी सांगितलं.





