कोंबड्यांच्या शेडमध्ये 'ड्रग्ज'चा कारखाना
पाचुपतेवाडी येथील एका निर्जन स्थळी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये जानेवारी महिन्यापासून एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. याबाबतची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याच्यासह एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणाहून अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचा तयार माल आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कच्च्या मालातून जर एमडी ड्रग्ज तयार झाले असते, तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत हजारो कोटी रुपये इतकी असती. मात्र, डीआरआयच्या पथकाने वेळेत धाड टाकून हा मोठा कट उधळून लावला. या ठिकाणची यंत्रसामग्री आणि कच्चा माल बघून तपास पथकही चक्रावून गेलं.
या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतकी मोठी धाड पडेपर्यंत सातारा आणि कराड पोलिसांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हे पथक थेट गुजरात आणि हैदराबादवरून आलं असल्याचं समजते. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, तपासाची गोपनीयता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
महिन्याभरातील दुसरी मोठी कारवाई
सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधी झालेली ही महिनाभरातील दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करून ड्रग्ज जप्त केले होते. आता कराडमध्ये ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती डीआरआय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.
