ही दुर्घटना घडल्यानंतर काही तासांत बचाव दलाला चार जण आढळून आले होते. यात तिघांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. तर एक तरुणी अंत्यवस्थ स्थितीत आढळून आली. तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास बचाव दलाला अन्य एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. फरहान मोहम्मद मणियार (वय 20) असं या तरुणाचं नाव आहे. तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रहिवासी होता. फरहानचा मृतदेह शिरोडा किनाऱ्यापासून आरवली सागरतीर्थ किनाऱ्यापर्यंत दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडला आहे. रात्री बारा वाजता समुद्र किनाऱ्यावर गस्ती घालून शोध घेणाऱ्या पोलीसांना आणि स्थानिकांना हा मृतदेह सापडला.
advertisement
या दुर्घटनेतील तीन पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. मात्र अंधारामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण बेळगाव आणि कुडाळ येथील दोन कुटुंबातील आहे. ही दोन्ही कुटुंबं पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर इथं फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनर्थ घडला. तीन जणांना शोधण्याचं काम सुरू आहे.