प्रांजल खेवलकर यांना अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आज प्रांजल खेवलकर यांच्यासह अन्य जणांना जामीन मिळाला. त्यांनी कुठेही अमली पदार्थाचे सेवन केलेले नव्हते किंवा त्यांनी अमली पदार्थ जवळ बाळगलेही नव्हते. तरीही त्यांना खोट्या आरोपाखाली पार्टी केली म्हणून सांगितले गेले, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
advertisement
कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रांजल खेवलकर यांना गोवलं
प्रत्यक्ष चार ते पाच जण एका घरात पार्टी करत होते, ती रेव्ह पार्टी होऊ शकत नाही. या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यावर फार मोठे गुन्हे आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी केले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र प्रांजल खेवलकर यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा नव्हता. कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात आले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
रेव्ह पार्टी प्रकरणात खेवलकर निर्दोष सुटतील, एकनाथ खडसे यांना विश्वास
प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला असून या प्रकरणात न्यायालयात होणाऱ्या खटल्यात ते निर्दोष सुटतील असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकारण किती खालच्या थरावर गेलेले आहे याचे उत्तम उदाहरण खेवलकर यांच्या प्रकरणात पाहायला मिळाल्याचे खडसे म्हणाले.
खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात प्रमुख आरोपी
पुण्यातील कल्याणीनगर येथे एका घरात प्रांजल खेवलकर यांच्यासहित इतर पाच आरोपींना कथित अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली. खेवलकर यांच्या चौकशीत अत्यंत गंभीर मुद्दे समोर आल्याचे सांगत पुणे पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी कशी वाढेल, असा युक्तिवाद न्यायालयात केला. अमली पदार्थ पार्टी, मुलींचे कनेक्शन आणि चॅटिंग असे गंभीर आणि तितकेच सनसनाटी आरोप पुणे पोलिसांनी खेवलकर यांच्यावर केले. तब्बल दोन महिन्यानंतर खेवलकर आता तुरुंगातून बाहेर येतील.