तीन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली होती. शिवरामनगर येथील सात ते आठ तोळे सोने, तब्बल 35 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे, फाइल्स, सीडीज आणि पेन ड्राइव्ह चोरीला गेल्याचे समोर आले. “ही फक्त साधी चोरी नसून चोरांना काय शोधायचं आहे हे नीट ठाऊक होतं,” असा गंभीर आरोप स्वतः खडसेंनी केला होता. त्यांनी भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह, सीडी चोरीस गेल्याचेही स्पष्ट केले होते.
advertisement
जळगाव पोलीस उल्हासनगरमध्ये...
जळगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाचा मागोवा घेत उल्हासनगरपर्यंत पोहोचले. तिथे दोन सराईत भावंडे या गुन्ह्याच्या संशयित यादीत असल्याचे उघड झाले. यानंतर जळगाव पोलिसांनी उल्हासनगरमध्ये तळ ठोकून विठ्ठलवाडी पोलिसांसोबत संयुक्त मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी सर्च ऑपरेशन्सही राबवण्यात आले असून संशयितांच्या नात्याने काही जणांची चौकशी सुरू आहे. हे दोन्ही संशयित आरोपी सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्ही तपासात समोर आले की, हे संशयित जळगाव शहरातील आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्याच काळात त्यांनी खडसे यांच्या बंगल्यात चोरी केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर अल्पावधीतच जळगावातील खडसे यांच्या घरात चोरी झाल्याने परिसरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
