जळगाव जिल्ह्यातील शीतल बोरडे या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल यांना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याअधिच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले.
मुंबईत वेळेत पोहोचणे त्यांच्यासाठी निव्वळ अशक्य होऊन बसले. आता आपली किडणी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होऊ शकेल की नाही ही एकच चिंता त्यांना सतावू लागली. मात्र त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरूनच मुंबईकडे जाणार असल्याचे समजले. बोरडे यांनी आपली अडचण विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातली.
advertisement
महाजन यांनी या महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावमध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच, असे त्यांनी महाजन यांना सांगितले.
यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले.
