भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. “महाराष्ट्रात फक्त देवाचा न्याय चालेल, नो भाईगिरी अँड नो दादागिरी!” असे त्यांनी लिहिले असून, या विधानामध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नसले तरी राजकीय उपरोध स्पष्ट दिसून आला. भाजप कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘देवाभाऊ’ म्हणून संबोधले जाते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भाई’ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘दादा’ अशी ओळख आहे. त्यामुळे तुषार भोसले यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वशैलीवरच निशाणा साधल्याचे मानले जात आहे.
advertisement
त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असलेल्या शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांची पोस्ट चर्चेत आली आहे. अक्षय महाराज भोसले यांनी 'देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी सर्वोतोपरी देवास सनाथ केले असल्याचे म्हटले आहे.
अक्षय महाराज यांनी काय म्हटले?
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी पोस्ट केल्यानंतर अक्षय महाराज यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना प्रत्युत्तर दिले असल्याची चर्चा रंगली आहे. अक्षय महाराज यांनी म्हटले की, 'देवाचं' राज्य नसताना 'एकनाथां'नी सर्वोतोपरी देवास सनाथ केले असल्याचे सांगत आमुचिया भावें तुज 'देव'पण । तें कां विसरोन राहिलासी ॥ अशी संतवाणी लिहिली.
त्यांनी पुढं म्हटले की, संत श्री 'एकनाथ' महाराजांच्या घरी देव राबत असे. अगदी श्री तुकाराम महाराजांच्या पर्यंत अनेकदा संतांना देवाला सांगावे लागले आहे. संतांच्या प्रयत्नामुळे भक्तीभावामुळे अर्थात संतांवर असणाऱ्या समाजाच्या विश्वासामुळे तुला देवपणा आले आहे. हे देवा तू विसरून गेला आहेस की काय? अशी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अक्षय महाराज भोसले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.
भाजप-शिंदे गटाच्या अध्यात्मिक आघाडीत संघर्ष?
शिंदे गटाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असलेले अक्षय महाराज यांनी आता थेट भाजपच्या तुषार भोसले यांना प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही पक्षांच्या अध्यात्मिक आघाडीत संघर्ष सुरू झालाय का, याची चर्चा रंगली आहे.