उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी बाराच्या सुमारास कक्षाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होत. यावेळी डॉ. चव्हाण यांनी राज्यातील परिस्थीतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरीक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
advertisement
नाशिकवरून हेलिकॉप्टर बोलवून अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करा
पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात ४० गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिकवरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी
तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे, त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, गेल्या २४ तासात सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे ३५ कोटी मेसेज पाठविण्यात आल्याची माहिती, कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.