उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी पावणे पाच वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले. बाप्पाचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू देत, पीकं चांगली येऊ देत, अशी प्रार्थना केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाकरे बंधूंची जवळीक वाढत असताना एकनाथ शिंदे यांचे राज ठाकरे यांच्या घरी जाणे हे अत्यंत सूचक असल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
advertisement
राज ठाकरे यांच्या घरी यंदा काही नवे लोक आले होते
राज ठाकरे यांच्याशी तुमचा उत्तम स्नेह आहे, कोणत्या विषयांवर चर्चा झाली? असे विचारले असता, गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता मला आमंत्रित केले होते. दरवर्षी मी त्यांच्या घरी येतो, यंदा काही नवे लोक त्यांच्या घरी आले. राज ठाकरेंच्या घरी नव्या लोकांना बघून आनंद झाला. अदखलपात्र लोक दखल घ्यायला लागले, कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, अशी फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.
राज ठाकरे यांच्याशी खासगीत काय चर्चा झाली?
राज ठाकरे यांच्याशी खासगीत झालेल्या चर्चेवर विचारले असता, राज की बात राज ही रहने दो, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर सस्पेन्स वाढवला. आमच्यात जी चर्चा झाली, ती खाजगीच राहू द्या, सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर सांगायच्या नसतात, असे शिंदे म्हणाले.
आमच्यात स्नेह आहेच, भोजन लवकरच होईल, शिंदेंची टोलेबाजी
काही लोकांना आत्ता स्नेहसंबंध आठवले, मात्र आमचा स्नेह आधीपासून आहे.. आमच्यात स्नेह असल्याने भोजनही लवकरच होईल, अशी टोलेबाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर केली.