या घडामोडीनंतर चर्चेत आलेले बाळराजे पाटील आता एकनाथ शिंदे यांच्या रडारवर आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बाळराजे पाटील यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. २००५ साली मोहोळमध्ये झालेल्या पंडित देशमुखांच्या खून प्रकरणावरून त्यांनी बाळराजे पाटील यांना टार्गेट केलं आहे. चुकीला माफी नाही, गुन्ह्याची शिक्षा होणारच, अशा शब्दांत शिंदेंनी बाळराजे पाटील यांना इशारा दिला आहे. रविवारी शिंदे मोहोळ दौऱ्यावर होते, त्यावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदेंनी हा इशारा दिला.
advertisement
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले की, "लोकांना निर्भयपणे जगता आलं पाहिजे. तुम्हाला गुंडाराज पाहिजे की विकास राज पाहिजे. तुम्ही सांगा, विकास करण्यासाठी आपला अजेंडा देखील विकासाचा पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, की पंडित देशमुख यांचा मोहोळमध्ये खून झाला होता. यात जो कुणी खूनी असेल, त्याला सजा झालीच पाहिजे. चुकीला माफी नाही."
"तुम्हाला हरीश साळवे पाहिजेत तर त्यांची नेमणूक करण्याचं काम आपण करू. त्यामुळे एका शिवसैनिकाचं आणि तालुका प्रमुखांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. अशा प्रकारची गुंडागर्दी महाराष्ट्रात कुणी खपवून घेणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, इथं लाडक्या बहिणी-भाऊ, शेतकरी निर्भयपणे राहिले पाहिजेत. तुम्हाला हे बदलायचं असेल तर याचा विकास करायचा असेल आणि गुंडशाही मुक्त मोहोळ करायचं असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्यय नाही," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पंडित देशमुख हत्या प्रकरण नक्की काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळमध्ये २००५ साली पंडित देशमुख यांची संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यात बाळराजे पाटीलसह 13 आरोपींचा समावेश होता. या सर्वांना निर्दोष सोडण्यात आले होते. पोलिसात ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली ते कोर्टात फुटले. त्यांनी साक्ष फिरवल्याने सर्वजण निर्दोष सुटले. त्यातील साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले, असा आरोप अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी दिली.
