मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या परळीमधील घटना असल्याची माहिती समोर आली आहे. परळीजवळ असलेल्या नाथरा फाटा इथं एका हॉटेल समोर एका तरुणांकडून भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणारा तरुण या व्यक्तीला शिवीगाळ करत आहे. हा तरुण दारूच्या नशेत असल्याचं दिसून येत आहे. या तरुणाने या वृद्ध व्यक्तीचे केस पकडले आणि मारहाण केली. या वृद्धाने पोलिसांनी फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल फोडून टाकला. हा तरुण सारखा आपल्या गाडीची चावी कुठे आहे, असं विचारत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
advertisement
घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तर या तरुणाने या वृद्धाच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. 'मी याला मारून टाकेन' असं तो व्हिडीओमध्ये बोलताना दिसून येत आहे. एवढंच नाहीतर, इथं कुठे पोलीस येणार आहे, अशी दमबाजीही करत आहे. थोड्यावेळाने काही लोकांनी या तरुणाला शांत केलं आणि वृद्धाला 'महाराज' तुम्ही तिकडे जाऊ बसा, असं सांगत तिथून जाण्यास सांगितलं.
दरम्यान, सोशल मीडियावर हा मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा तरुण कोण आहे आणि मारहाण करण्यात आलली वृद्ध व्यक्ती कोण आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, वृद्धा झालेली अमानुष मारहाण पाहून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
