उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली होती. बडगुजर यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षनेतृत्वाने त्यांना घरचा रस्ता दाखवला. बडगुजर यांनीही राजकीय पर्याय चाचपून पाहिले. भाजप नेत्यांशी त्यांचे बोलणे झाल्यानंतर आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. दुसरीकडे ठाकरे गटात नाराज असलेले 'फिरते नेते' बबनराव घोलप यांनाही गळाला लावण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे.
advertisement
नाशिकमध्ये ठाकरे सेनेला खिंडार, उद्या कोण कोण प्रवेश करणार?
सुधारकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला नाशिक शहरात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. बडगुजर आणि घोलप यांच्या पक्षप्रवेशावेळी १५ हून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांची दिली आहे. पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी केलेले गणेश गीतेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
एकहाती सत्ता आणण्यासाठी बडे नेते फोडून गिरीश महाजन यांनी मोठी खेळी खेळली
नाशिक महापालिकेत शिवसेना, भाजप तसेच आघाडीची देखील ताकद आहे. मात्र पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजन यांनी सेनेतील बडे नेते फोडून मोठी खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नाराज नेते घोलपांना गळाला लावले
माजी मंत्री बबनराव घोलप हे ठाकरे गटात नाराज होते. पक्षाच्या बैठकांना तथा कार्यक्रमांना ते हजेरी लावत नव्हते. त्याचवेळी त्यांच्या मनात कोलांटउडी मारण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत होते. अखेर सोमवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.