मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी तीन एकरात पपईची लागवड केली होती. पपईच्या बागेचा एकही रुपया हातात न घेता संपूर्ण बागेवर नागेश यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागेवर रोग पडल्याने अर्ध्याच्या वर पपईची झाडे जळून गेली तर काहींना फळधारणा होत नव्हती यामुळे संपूर्ण बागेवर नांगर फिरवावा लागला.
advertisement
पपईच्या बागेच्या लागवडीसाठी नागेश गायकवाड यांना दोन ते अडीच लाख रुपये पर्यंत खर्च आला होता. नागेश यांची जवळपास सहा ते सात महिन्याची ही बाग होती. पपईच्या बागेची लागवड केल्यावर त्यावर कोणताही रोग पडू नये, पपईची झाडे जळून जाऊ नये करपा रोग होऊ नये, यासाठी नागेश यांनी पोटच्या मुलाप्रमाणे ही बाग जपली होती. परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण बाग जळून गेली आहे.
पपईची बाग अतिवृष्टीमुळे जळाली नसती, तर नागेश गायकवाड यांना या बागेपासून लागवडीचा खर्च वजा करून सहा ते सात लाखाचा उत्पन्न मिळणार होता. पपईच्या बागेवर पाहिलेल्या सर्व स्वप्नावर नागेशने नांगर फिरवला आहे. शासनाने बळीराजाकडे लक्ष देऊन योग्य ती मदत करावी असे आवाहन शेतकरी नागेश गायकवाड यांनी केले आहे.