नांदेड : सध्या हिवाळा ऋतू सुरु असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यात्रांचे आयोजन केले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील माळेगावात देखील अशीच एक यात्रा भरली असून या यात्रेत तब्बल 20 हजार किंमतीची फायटर कोंबडा-कोंबडी जोडी दाखल झाली आहे. या फायटर कोंबड्याने माळेगाव यात्रेतील पशू प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला असून या कोंबड्याला पाहण्यासाठी आसपासच्या गाव आणि शहरातील नागरिक गर्दी करत आहेत.
advertisement
नांदेड येथील माळेगाव यात्रा ही पंचक्रोशीत फार प्रसिद्ध आहे. यंदा या यात्रेतील पशु प्रदर्शनात आलेली फायटर कोंबडा कोंबडीची जोडी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी या गावातील रहिवासी बाबुराव मुंडे यांचा हा फायटर कोंबडा असून या कोंबड्याचा वापर हा खास झुंजीसाठी केला जातो. या कोंबड्याची उंची अडीच फूट इतकी असून याला झुंजीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
फायटर कोंबड्याच्या रुबाब जेवढा भारी आहे तेवढाच त्याचा खुराक देखील दांडगा आहे. आठ महिन्यांचा हा कोंबडा दररोज शेंगदाणे, मका, ज्वारी,गहू, इत्यादी धान्य खातो. कोंबड्याचे मालक बाबुराव मुंडे यांनी या कोंबडा कोंबड्याची जोडी काही महिन्यांपूर्वी 10 हजार रुपयांना खरेदी केली होती. परंतु आता याच फायटर कोंबडा कोंबडीच्या जोडीची किंमत जवळपास 20 हजार इतकी आहे.