पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील कलानगर भागात ही घटना घडली. सुनील माळी हे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी आहे. सुनील माळी राहत असलेल्या कलानगर येथील त्यांच्या घरासमोरच दोघा हल्लेखोरांकडून मंगळवारी रात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला. दोन्हीही हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. घराजवळ उभे असलेल्या सुनील माळी यांच्यावर दोघांनी हल्ला केला. यावेळी हल्लेखोर आणि माळी यांच्यामध्ये झटापट झाली. हे पाहून स्थानिकांनी धाव घेतली. तेव्हा हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
advertisement
हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्यानंतर माळी हे जागेवर कोसळले. स्थानिकांनी माळी यांना तातडीने सांगलीच्या मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सुनील माळी यांच्या फुफुसमध्ये चाकू अडकल्याने प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खुनी हल्ल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोघे हल्लेखोर पसार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, सुनील माळी यांच्यावर हा दुसऱ्यांचा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधीही शहरामध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता. सांगली पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकाबंदी लावली आहे. सांगली शहर पोलीस तपास करत आहेत.
