निकालानंतर झाले भावूक
निकाल जाहीर होताच कोल्हे कुटुंबीयांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विजयाचा आनंद साजरा करताना भावनिक सूर अधिक ठळकपणे दिसून आला. ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ललित सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर अतिशय घृणास्पद आरोप लावण्यात आले आहेत. तरीही मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी मोठा आधार आहे. मताच्या माध्यमातून जनतेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. हा विजय म्हणजे मतदारांनी दिलेला प्रेमाचा आणि विश्वासाचा कौल आहे.”
advertisement
सरिता कोल्हे पुढे म्हणाल्या की, “माझा नवरा, मुलगा आणि सासू तिघेही एकाच वेळी निवडून आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ललित यांना अटक झाल्यापासून आम्ही प्रचारादरम्यान पादत्राणं घातली नाहीत. अन्यायाच्या विरोधात हा आमचा शांत मार्ग होता. ललित तुरुंगातून परतल्यानंतरच पादत्राणं घालीन, असा निर्धार केला होता. आज मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवून सगळं शक्य करून दाखवलं आहे.”
काय होता आरोप?
दरम्यान, ललित कोल्हे हे बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. अटक झाल्यानंतर नऊ दिवस ते पोलीस कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याने प्रशासनाने त्यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही मतदारांनी कोल्हे यांना निवडून दिल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ललित कोल्हे यांचा राजकीय प्रवासही तितकाच लक्षवेधी राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मनसे, भाजप आणि खान्देश विकास आघाडी अशा विविध पक्षांत काम केले. राजकीय वाटचालीतील अनेक वळणांनंतर अखेर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत स्थिरावले. शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी जळगावमधील संघटन मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकूणच, तुरुंगात असतानाही मिळालेला विजय, कुटुंबातील तिघांचा एकत्रित यशस्वी निकाल आणि त्यामागील भावनिक पार्श्वभूमी यामुळे ललित कोल्हे आणि कोल्हे कुटुंबीयांचा विजय केवळ राजकीय नसून तो जनतेच्या भावनांचा आरसा ठरला आहे. हा निकाल जळगावच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
