गडचिरोली : न्यायाधिशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा एके-47 बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांमुळे मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता, तेव्हा त्याच्या अत्याधुनिक अशा एके-47 बंदुकीतून 8 गोळ्या सुटल्या. गडचिरोलीचे जिल्हा सत्र न्यायाधीश वसंत कुलकर्णी यांच्या सुरक्षेमध्ये हा सशस्त्र पोलीस कर्मचारी तैनात होता.
आज दुपारच्या सत्रानंतर न्यायाधीशांना न्यायालयात सोडल्यानंतर त्यांचे सगळे सुरक्षारक्षक गाडीतून उतरले, मात्र पोलीस अमलदार असलेले उमाजी होळी गाडीतच बसून होते. थोड्याच वेळात गाडीतून बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांचे आवाज ऐकू आले.
advertisement
उमाजी होळी यांच्या बंदुकीतून एका पाठोपाठ एक 8 गोळ्या सुटल्या. जखमी अवस्थेमध्ये उमाजी होळी यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. बंदूक हाताळत असताना अनावधानाने गोळी झाडली गेल्यामुळे उमाजी होळी यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
