गडचिरोली -चामोर्शी मार्ग बंद झाल्यानं दक्षिण गडचिरोलीतल्या पाच तालुक्यांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात रात्रीपर्यंत 27 मार्ग बंद होते आता ही संख्या वाढून 30 च्या वर गेली आहे. पाऊस सुरूच असल्यामुळे पुराचा धोका आणखी वाढला आहे. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अशीच स्थिती आहे. वर्ध्यात सलग तिसऱ्या दिवशीही रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं नद्या व नाले तुडूंब भरून वाहत आहेत. वडद इथल्या भदाडी नदीला मोठा पूर आल्यानं रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
रत्नागिरी जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने पुढील 24 तास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. तसेच यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
