महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक डावपेच आखणे सुरुच ठेवले आहे. मित्रपक्षांचा प्रभाव असला तरीही तेथे आपल्या पक्षाची ताकद असलीच पाहिजे, असा भाजपचा होरा आहे.
गणेश नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यात काम करण्याचा त्यांना गेली ३० ते ३५ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीची जबाबदारी भाजपने गणेश नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे.
advertisement
येत्या ११ एप्रिल रोजी गणेश नाईक यांचा जनता दरबार ठाणे शहरात होणार आहे. तसे बॅनर देखील ठाणे जिल्ह्याभर लावण्यात आले आहेत. मंत्री गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख बवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष पहायला मिळतोय.
फेब्रुवारी महिन्यात गणेश नाईक यांनी पहिला जनता दरबार दोन दशकानंतर ठाण्यात घेतला होता. या जनता दरबाराला लोकांची प्रचंड उपस्थिती होती. त्यावेळी सरकारमधले फक्त अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे हे उपस्थित होते परंतु शिंदे गटाचा एकही पदाधिकारी गणेश नाईकांच्या जनता दरबारला उपस्थित राहिला नव्हता.
यानंतर आता पुन्हा एकदा ११ एप्रिल २०२५ या दिवशी मंत्री गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कोणी हजेरी लावतायेत की पुन्हा गणेश नाईकांच्या जनता दरबाराकडे पाठ फिरवतात, यावरुन शिंदे विरुद्ध नाईक लढाई कितपत खोलवर गेलीये हे स्पष्ट होईल.
