जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं (अजित पवार गट) घड्याळ हाती बांधलं आहे. या पक्षप्रवेशावर भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे. विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन अजित पवारांनी प्रोटोकॉलचा भंग केल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील ४ आणि धुळे जिल्ह्यातील एका माजी आमदाराचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. जे आमच्या विरोधात लढले आहेत, त्या मविआमधील कोणालाही प्रवेश देताना प्रोटोकॉल ठरला होता. पण तो पाळला गेलेला नाही. याबाबतीत आम्ही वरिष्ठांशी बोलू, असंही मंत्री महाजन यांनी म्हटलं.
आता आम्हालाही कोणालाही पक्षात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपात त्यांना आम्ही प्रवेश दिला तर अजित पवार यांनी काही बोलायला नको. असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार गटातील पक्षप्रवेशावरून नाराजी व्यक्त केली. या पक्ष प्रवेशावर शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आक्षेप घेतला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेना शिंदे गटाची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केले आहे. ज्यांच्या छाताड्यावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला आहे. त्यांना पक्षात घेताना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने एकनाथ शिंदे यांना विचारात घेणे अपेक्षित होते असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. एकूणच अजित पवार गटात झालेल्या पक्षप्रवेशामुळे महायुतीत मिठाचा खडा पडताना दिसत आहे.
