सोन्याच्या या दरकपातीमुळे सुवर्णनगरीतील ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी याच संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात खरेदी केली. विशेष म्हणजे, लक्ष्मीपूजनाचा साडेतीन मुहूर्त लाभदायक मानला जातो, त्यामुळे सायंकाळच्या सुमारास सुवर्णनगरीत ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गेल्या वर्षीचा दर सुमारे ८० हजार रुपयांवरून थेट १ लाख ३५ हजारांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना जवळपास ५५ हजार रुपयांचा परतावा अनुभवास आला. मात्र, आजच्या या अचानक घसरणीमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीची खरेदी हा लक्ष्मीपूजनाच्या पारंपरिक श्रद्धेचा अविभाज्य भाग मानला जातो.
advertisement
"आजच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि भरभराटी वाढते," अशी भावना नागरिकांत दिसून येत आहे. सुवर्णनगरीतील सराफ बाजार, सुवर्ण गल्ली आणि मुख्य व्यापारी परिसरात उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झालेल्या या दरकपातीमुळे विक्रमी उलाढाल होण्याची शक्यता असून, ग्राहकांचा प्रतिसाद पाहता यंदाची दिवाळी सराफ व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत.