सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला हा बाळ लोकांच्यात कधी जाणार ? गावात गेल्यावर प्रश्न कळतात, रोहित पवार गावात जाणार कधी? रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा, पोस्टल मतावरती निवडून आला हे लक्षात ठेवावं. उद्या तिथून तो निवडून पण येणार नाही, अशी टीका करीत रोहित पवारांच्या विरोधात ठासून पूर्ण क्षमतेने काम करू, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
advertisement
रोहित पवार हा औरंगजेबासारखा, मला अजित पवारांच्या पोरांची काळजी वाटते
रोहित पवार यांच्यात प्रचंड खोटेपणा आहे. रोहित पवारांच्या चुलत्याने (अजित पवार) कालच त्यांची अब्रू काढली आहे. पोस्टल मतावर निवडून आला आहे असे अजित पवार कालच जाहीरपणे म्हणाले. मला अजित पवारांच्या पोरांची काळजी वाटते. कारण रोहित पवार हा औरंगजेबासारखा आहे. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला होता. तशीच कृती रोहित पवार हा अजित पवारांच्या पोरांबरोबर करेल अशी मला शंका आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये तो आमदारकी घालवून बसेल
मी पवारांना उलटा सुलटा करून पुरून उरलो आहे. रोहित पवार सरकारच्या नाकात दम आणतोय अशी कोणतीही परिस्थिती नाही. मीडियामध्ये बातमी लागली म्हणजे तुम्ही शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही, अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली. महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये तो आमदारकी घालवून बसेल, त्यामुळे त्याने काळजी घेणे आवश्यक आहे, असे पडळकर म्हणाले.
जयंत पाटलांनी राजकारणात लाचारी स्वीकारली आहे
जयंत पाटलांची मानसिकता पूर्णपणे खचलेली आहे. सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका झुकत नाही हे त्यांनी केलेलं स्टेटमेंट योग्य वाटत नाही. सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील झुकत नाही, पूर्ण पालथा पडतो. हिम्मत असेल तर लोकांसाठी लढा, लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधात बोला ना.. सभागृहातील भाषण ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल जयंत पाटील हे सरकारच्या बाजूने बोलतोय का विरोधात बोलतोय. सरकारच्या विरोधात लढायला हिम्मत लागते. जयंत पाटलांसारखी राजकारणातली विटंबना मी बघितली नाही. जयंत पाटलांनी राजकारणात लाचारी स्वीकारली, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
