जळगावच्या पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात आपल्या राजकीय प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला.
पूर्वी आंदोलने करताना जिथे अटक व्हायची, त्याच पोलीस स्टेशनची इमारत बांधण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. शिवसेनेची शाखा पाळधीमध्ये उघडली तेव्हा वाटले नव्हते की मी कधी मंत्री होईन. गावात टवाळ म्हणून ओळख होती. पण याच गावाने मला मोठे केलं आणि राजकारणात उभे राहायला ताकद दिली, असा विशेष उल्लेख गुलाबराव पाटील यांनी केला. पाळध गावाचे योगदान माझ्या आयुष्यात खूप आहे. आज मी जो काही आहे ते पाळध गावामुळेच... असे उद्गार गुलाबराव पाटील यांनी काढले.
advertisement
याच पोलीसच्या आवारात शिवसेनेची शाखा सुरू झाली. शाखेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. १९८५ साली राजकारणाला सुरुवात केली. तेव्हा माहिती नव्हते की ज्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार केस झाल्या त्याच पोलीस स्टेशनचे बांधकाम करण्याची जबाबदारी आपल्यावर येईल आणि उद्घाटनही आपल्या हस्ते होईल... सगळीकडे भाषणे करतो पण गावात भाषण करताना जरा अडचण येते. कारण याच गावात लहानाचा मोठा झालो, असे गुलाबराव पाटील म्हणाले.