राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या कागल नगर परिषदेत कट्टर विरोधक एकत्र आल्याने काहीशी चुरस कमी झालेली असली तरी अंतिम निवडणूक आणि निकालासाठी कार्यकर्ते नेते सज्ज आहेत.
कोण आहेत सेहरनिदा मुश्रीफ?
कागलमध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाने माघार घेतली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सेहरनिदा मुश्रीफ यांची कागलच्या नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक नऊमधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी आहेत. सेहरनिदा मुश्रीफ यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नूरजहा नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु माघारीच्या दिवशी नूरजहा नायकवाडी यांनी अर्ज मागे घेतल्याने सेहरनिदा यांची बिनविरोध निवड झाली.
advertisement
पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात, राजकीय कारकीर्दीचा विजयी श्रीगणेशा
सेहरनिदा मुश्रीफ या कधीही निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय नव्हत्या. मुश्रीफ घराण्यात राजकीय वातावरण असल्याने यंदा पहिल्यांदाच त्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. परंतु शिवसेना शिंदे गटाच्या नूरजहा नायकवाडी यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक टळून सेहरनिदा मुश्रीफ यांनी गुलाल उधळून विजयी सलामी दिली.
