पश्चिम बंगालच्या उपसागरात खालपासून आडवी रेघ कमी दाबाच्या पट्ट्याची तयार झाली आहे जी अरबी समुद्रापर्यंत जात आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नवरात्रौत्सव आणि दिवाळीपर्यंत पावसाचा मुक्काम राहील. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. राज्यात पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे यशोदा नदीला पूर आला. पुरामुळे वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तर अनेक घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पावसामुळे वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झालेत. दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सलग पुढचे दोन दिवस आता मुसळधार पाऊस राहणार आहे.
पाच ते सहा दिवसाच्या उघडीनंतर, परभणी जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून, या पावसामुळे शेतातील मूग पिकाला मोठा फटका बसत आहे. मुगाचे पीक ऐन काढणीमध्ये आलेल असताना, झालेल्या या पावसामुळे मूग काळा पडतोय. तर दुसरीकडे अळ्या आणि किडीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास, निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. येणाऱ्या काळात पावसाने उघडीप नाही दिली तर, मुगाच्या एकूण उत्पन्नावर देखील याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.