हिंगोली विधानसभेचे विद्यमान भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देत मोठी घोषणा केली आहे. 'मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर आपण 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही' असं मुटकुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी सुद्धा मराठा घरातच जन्माला आलो आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. त्याबद्दल मला कळवळा आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही दिल्या गेलं तर मराठा समाजावर होणारा अन्याय आम्ही पदावर राहून सहन करू शकत नाही. विधानसभेच्या येत्या अधिवेशनामध्ये आम्ही हा मुद्दा लावून धरू, त्यामुळे मराठा समाजाने आमच्यावर अविश्वास दाखवू नये, असं आवाहनही यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी एका व्हिडिओद्वारे केलं आहे.
advertisement
नेत्यांना गावबंदी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येत आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे कुणबी समाजाकडून या मागणीला विरोध होत आहे. त्यामुळे सरकार या प्रश्नावर कशाप्रकारे तोडगा काढणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
