खरं तर, मागील काही दिवसांमध्ये मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांची शेती वाहून गेली आहे. पीकं सडून गेली आहेत. अनेक पिकांना कोंब फुटले आहेत. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांकडून केवळ अतिवृष्टींचा कमी फटका बसलेल्या गावांचा सर्व्हे केला जात असल्याचा आरोप आहे, यावरून संतोष बांगर यांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला फोन करून कानउघडणी केली आहे.
advertisement
कंपनीच्या एकाही व्यक्तीला हिंगोली जिल्ह्यात फिरू देणार नाही. जिथे जिथे कंपनीची ऑफिस असतील, तिथे जाऊन ऑफिसचा चुरा करू, असा धमकीवजा इशाराही बांगर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांचे हित पाहा, नाहीतर तुम्हाला फिरू देणार नाही. हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा. काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर संतोष बांगर एवढा कोणी वाईट माणूस नाही, असं देखील आमदार या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. याची पुष्टी न्यूज १८ लोकमत करत नाही.
संतोष बांगर नक्की काय म्हणाले?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये संतोष बांगर म्हणाले की, "मराठवाड्यात अतिशय भयानक परिस्थिती आहे. सगळी वाट लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, वस्तुस्थितीनुसार तुमचा सर्व्हे झाला पाहिजे. कंपनीचं हित पाहून नका. शेतकऱ्यांचं हित बघा. काही कमीजास्त झालं तर संतोष बांगर सारखा वाईट माणूस कुणी नाही. मी हिंगोलीत तुमचा एकही माणूस राहू देणार नाही. जिथे जिथे तुमचे ऑफिस आहेत, तिथे जाऊन चुरा करू, पण कंपनीच्या तुमच्या सगळ्या माणसांना फिरू देणार नाही. तुम्हाला तुमचे हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पाहा, नसेल तर माझ्याएवढं कुणी वाईट नसेल."
