खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना घेराव घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर खासदार पाटील यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या नावाने लिहिला आहे. यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. यावेळी आमदार खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली. मात्र, मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो असे खासदार पाटील यांनी यावेळी सांगितले. व लागलीच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहिला आहे.
advertisement
जरांगे पाटील यांची चर्चेची तयारी
मराठा आरक्षणासाठी मागच्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यातच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसांमध्ये चर्चेला यायचा आग्रह केला आहे. ‘फडणवीस यांनी दोन दिवसात माझ्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवालीत यावं, मला बोलता येतं तोपर्यंतच यावं, तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. उलट तुमच्या गाड्यांना संरक्षण देऊ,’ असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी धरला आहे.
वाचा - 'मला बोलता येतंय, तोपर्यंतच...', उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा फडणवीसांना आग्रह
फडणवीसांचं जरांगे पाटलांना आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवावा, आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांची टीम तिकडे हजर असून त्यांचा जीव महत्त्वाचा असल्याचं फडणवीसांनी नमूद केलं आहे. त्यांच्यासोबत जे लोक आहेत त्यांनीही त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत आणि योग्य निर्णय झाले पाहिजेत असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चालला आहे, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना केलं आहे.
