इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीवरून विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी केल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या दोन शासकीय आदेशांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा अधिवेशनच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाला करावी लागली. सरकारच्या माघारीवर जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आले होते. या मेळाव्यातून माय मराठी आणि मराठी मातीचा सन्मान कायम रहावा यासाठी ठाकरे बंधूंनी मार्गदर्शन केले. तब्बल २० वर्षांनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आले होते. ठाकरे बंधू कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याने इम्तियाज जलील यांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावर इम्तियाज जलील म्हणाले...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याने महाराष्ट्रवासियांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. दोन्ही भावांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार बदलले आहेत. दोघे मुस्लिमांना सोबत घेऊन राजकारण करतील, अशी आशा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. तसेच मी स्वतः कट्टर महाराष्ट्रीय आहे. अस्सल मराठीमध्ये बोलतो आणि मी मराठी बोलतो, त्याचा मला खूप अभिमान वाटतो..असेही जलील यांनी सांगितले.
जे बाळासाहेबांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले
मुंबईतील मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. मराठी भाषेला संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा कसा डाव आहे, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, उद्धव आणि मला एकत्र आणले, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.