संगमनेर, 13 ऑक्टोबर : अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज आज संगमनेर कोर्टात हजर झालेच नाही. त्यांच्या विरोधात आजपासून नव्याने सुनावणी सुरू झाली असून आता 8 नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना आता पुन्हा कोर्टात हजर राहावं लागणार आहे. 2020 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदुरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला आजपासून नव्याने सुरू झाला आहे.
advertisement
आज इंदोरीकर महाराज मात्र कोर्टात हजर राहिले नाही त्यामुळे पुढील सुनावणी आठ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
इंदुरीकर महाराजांना समन्स बजावले जाणार असून त्यांना जामीन घेण्यासाठी कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. कायद्यापुढे कोणीही मोठा नसून त्यांना स्वतः कोर्टात हजर राहावे लागणार असल्याचं गवांदे यांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात कीर्तनावेळी इंदुरीकर महाराज म्हणाले होते की, सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. ओझर इथं किर्तनात इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हे वक्तव्य PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन करत असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांकडून करण्यात आला होता. तेव्हा इंदुरीकर महाराजांना नोटीसही पाठवण्यात आली होती.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
