महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील लोकप्रिय किर्तनकार, प्रबोधनकार इंदूरीकर किर्तनाला कायमचा निरोप देत फेटा खाली ठेवण्याच्या मानसिकतेत पोहोचलेत. मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात असल्यानं इंदुरीकर व्यथीत झालेत.
सोशल मीडियावर त्यांची चांगलीचं शाळा घेतली
इंदुरीकरांच्या मुलीचा नुकताच राजेशाही साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या किर्तनातील उपदेशाची आठवण करून देत तुफान ट्रोल केलं जातंय. जिथं इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना सागत होते की लग्न साधे केले तरी पोरं होतात. इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीचं शाळा घेतलीय.
advertisement
किर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य
इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य करतात. पण त्याचवेळी त्यांच्या महिलांबद्दलच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. त्यामुळे इंदुरीकर पहिल्यांदाच वादात सापडले असं नाही. त्यांच्या किर्तनाच्या स्टाईलवरून, किर्तनातल्या शब्दांवरून अनेक वाद निर्माण झाले. अगदी त्यांना कोर्टाची पायरीही चढावी लागेली होती.
इंदुरीकर महाराज आणि आतापर्यंत झालेले वाद
- 2019 मध्ये शिक्षकांबद्दल भावना दुखावणारं वक्तव्य केल्यानं शिक्षक संघटना नाराज झाल्या.
- 2022 मध्ये किर्तनात माळा काढणाऱ्यांनीच कोरोनाची तिसरी लाट आणल्याचा दावा केला.
- माझे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील असं म्हणत अभिशाप दिला.
2020 ला किर्तनात सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, विषम तिथीला मुलगी होते. अशुभ वेळी झाल्यास संतती रांगडी-बेवडी होते असं वक्तव्य केलं. PCPNDT कायद्याचे उल्लंघन आणि अंधश्रद्धा पसरविण्याचा आरोप आरोग्य विभागानं नोटीस पाठवली, इंदुरीकरांनी प्राचीन ग्रंथांवर आधारित असल्याचं सांगितलं
साध्या लग्नाचा उपदेश देणाऱ्यांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केल्यामुळे टीका केली. किर्तन परंपरा ही वारकरी संप्रदायातील प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे फेटा बांधून गादीवरून उच्चारलेल्या शब्दाला कृतीची जोड नसेल आणि शब्द परंपरेला शोभणारे नसतील तर टीका होणं स्वाभाविक आहे. इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणाऱ्यावर कायद्यानं कारवाई व्हावी पण इंदुरीकरांची भाषाही स्टँडअप कॉमेडीसारखी नाही तर वारकरी परंपरेला साजेशी असावी ही अपेक्षा आहे.
