या प्रकरणावर आता माजी मुंबई पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, पोलीस खात्यातील अधिकारी जेव्हा कायदेशीर कारवाई करतात, तेव्हा राजकीय दबाव येणे ही काही नवीन गोष्ट नाही. “राजकीय दबाव असतोच, पण त्याला कसे हाताळायचे हे महत्त्वाचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेला धाडसपूर्ण दृष्टिकोन ही त्यांची खरी अग्निपरीक्षा आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत DGP, CP आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा उभी आहे,” असे मत शिवानंदन यांनी व्यक्त केले.
advertisement
काय म्हणाले माजी आयुक्त?
आपल्या कारकिर्दीतही स्वतःवर अशाच प्रकारचा राजकीय दबाव आला होता, असे शिवानंदन यांनी आठवले. मात्र अशा परिस्थितीत अधिकारी म्हणून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे आणि दबाव न झुकता काम करणे हेच योग्य ठरते, असेही ते म्हणाले. “लोकशाहीत कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलीसांची जबाबदारी आहे. राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे. अंजना कृष्णा यांनी दाखवलेले धैर्य ही पोलीस सेवेच्या सन्मानाची बाब आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणाकडे राज्याचं लक्ष
अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या संवादामुळे निर्माण झालेली चर्चा आता राजकीय वर्तुळाबरोबरच पोलीस दलातही रंगू लागली आहे. शिवानंदन यांची प्रतिक्रिया या चर्चेला नवा पैलू देणारी ठरली आहे. त्यांनी दिलेले समर्थन अंजना कृष्णा यांना नैतिक बळ देणारे मानले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि त्यातून होणारी कारवाई याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.