जळगाव : राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जळगावसह सर्व २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. खान्देशातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी जळगाव महानगरपालिका या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
advertisement
जळगाव महापालिकेचा इतिहास काय?
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहरासाठी जळगाव महानगरपालिका ही प्रमुख शहरी प्रशासकीय संस्था आहे. २१ मार्च २००३ रोजी या महापालिकेची स्थापना झाली. खान्देशच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी जोडलेले जळगाव शहर औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारीदृष्ट्या वेगाने विकसित झाले आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर श्रीमती आशा दिलीप कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला, तर अब्दुल करीम सालार हे पहिले उपमहापौर ठरले. सुमारे ६८.७८ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४.६० लाख आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी या महापालिकेवर आहे. २०२६ मध्ये या संस्थेला स्थापनेची २२ वर्षे पूर्ण होत आहेत.
२०१८ च्या निवडणुकीचा आढावा
जळगाव महापालिकेच्या शेवटच्या निवडणुका २०१८ मध्ये पार पडल्या होत्या. एकूण १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. तब्बल चार दशकांपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जळगावमध्ये भाजपने मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला होता. शिवसेनेला १५, तर AIMIM ला ३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.
यंदाचे आरक्षण आणि जागावाटप
जळगाव महानगरपालिकेने १९ प्रभागांतील ७५ जागांसाठी प्रारूप आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये ३८ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४, ओबीसीसाठी २० आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४६ जागांचे आरक्षण आहे. १८ प्रभागांमध्ये चार सदस्य, तर एका प्रभागात तीन सदस्यांची रचना करण्यात आली आहे.
दुसरीकडे शिवसेना (उबाठा ) (४३) काँग्रेस (२५) राष्ट्रवादी (sp) ३२ वंचित बहुजन आघाडी (६) तर एमआयएम (८) जागा लढत आहे. या पक्षाची युती नसून वेगवेगळे लढत आहेत.
महायुतीची रणनीती आणि बिनविरोध विजय
यंदा जळगावमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपला ४६, शिवसेना (शिंदे गट) २३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६ जागा देण्यात आल्या आहेत. उमेदवारीवरून काही ठिकाणी नाराजी दिसून येत असली तरी ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी भाजप आणि शिंदेसेनेचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. या घडामोडींमुळे जळगावमध्ये यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
