रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाला पिंप्राळा परिसरात एका घरामध्ये देहविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. छापेमारीदरम्यान त्या घरामध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तेथे असलेल्या ४ महिलांची सुटका केली.
सुटका करण्यात आलेल्या महिलांना प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांना आवश्यक ते समुपदेशन व संरक्षण देण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान काही वस्तूंसह रोकड रक्कमही जप्त केली आहे.
advertisement
या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आरोपींना रामानंदनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा म्हणजेच PITA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कुंटणखाण्यामागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का, महिलांना कशा प्रकारे येथे आणण्यात आले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
भरवस्तीत अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून भविष्यातही अशा कारवाया सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
