प्रशांत पवन खैरनार (वय १८) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावं आहेत. दोघंही पाळधी येथील महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी असून, एकमेकांचे चांगले मित्र होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत आणि हर्षवर्धन रविवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर ‘रील’ शूट करत होते. ट्रॅकवर धोकादायक पद्धतीने उभे राहून ते व्हिडीओ बनवत असताना, धरणगावकडून वेगाने येणाऱ्या अहमदाबाद–हावडा एक्स्प्रेस गाडीचा त्यांना अंदाज आला नाही.
advertisement
गाडी अत्यंत वेगात असल्याने त्यांना सावरण्याची किंवा बाजूला होण्याचीही संधी मिळाली नाही. क्षणातच रेल्वेने दोघांनाही जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघांचाही जागीच चिरडून मृत्यू झाला.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर मृत तरुणांच्या नातेवाईकांसह पाळधी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. १८ वर्षांच्या दोन तरुणांचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
