जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. टवाळखोर मुलांविरोधात सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय?
मुक्ताईनगर येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. या यात्रा महोत्सवात भाजपच्या मंत्र्यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली. सुरक्षारक्षकांनी टवाळखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु टवाळखोर त्यांच्यासमोर बधले नाहीत. त्यांनी शेरेबाजी करणे सुरुच ठेवले. तसेच मुलींना धक्काबुक्कीही झाली.
advertisement
सदर प्रकरणाविरोधात सुरक्षारक्षक घाईघाईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी गेले. त्यांच्या मागोमाग भाजपच्या बड्या नेत्याही तिथे पोहोचल्या. त्यांची पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. सदर आरोपींना काही तासांतच अटक झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.
आरोपी मोकाट, पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही
गुन्हा घडूनही संबंधित आरोपींवर कोणताही कारवाई झालेली नाहीये. पोलीस चौकशी सुरू आहे. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच खुद्द रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जावे लागले. त्यांनी घटनेच्या तपासावरून पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समजते. संबंधित घटनेच्या कारवाईची माहिती मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकांनी खडसे यांना दिली.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
संतोष देशमुख हत्या प्रकरण, बदलापूर बलात्कार तसेच पुणे बलात्कार प्रकरणांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बरी नसल्याचे दाखवून दिले आहे. दरदिवशी कुठे ना कुठे गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. आता भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलीचीच टवाळखोरांनी छेड काढल्याने, सामान्यजण सुरक्षित नाहीतच पण आता नेत्यांच्या मुलीही सुरक्षित नसल्याचेच दिसून येते.
