पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव मुकेश भिका धनगर (वय ३८, रा. पैलाड) असे आहे. रात्री ११ वाजता मुकेश घराबाहेर गेला असताना हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्याचा आरोपी निखिल उतकरसोबत वाद झाला. तंबाखू दिली नाही यावरून हा वाद झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुकेशचा भाऊ दिनेश भिका धनगर याला याची माहिती मिळताच तो घटनास्थळी पोहोचला. त्याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी निखिलने दिनेशलाही दगड मारला.
advertisement
दिनेश मदतीसाठी त्याच्या इतर भावांना बोलावण्यासाठी घरी गेला आणि परत येऊन पाहिले असता, आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात आणि तोंडावर एका मोठ्या दगडाने मारत होता. हा गंभीर प्रकार पाहून दिनेशने आरडाओरडा करून मुकेशला आरोपीच्या तावडीतून सोडवले आणि तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुकेशला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी निखिल उतकरला लगेच अटक केली. एका क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.