नेमकं काय घडलं?
मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील जुन्या पालिका दवाखान्याजवळून प्रभाकर चौधरी आपल्या स्कुटीवरून जात होते. त्याच वेळी, सोमा चौधरी आणि त्याच्या साथीदारांनी कारने त्यांचा पाठलाग केला आणि स्कुटीला धडक दिली. धडकेमुळे चौधरी खाली पडल्यानंतर, हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. नागरिकांनी धाव घेतल्याने हल्लेखोर त्यांच्या कारने छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पळून गेले.
advertisement
हल्ल्यामागचे कारण
या हल्ल्यामागे दोन महिन्यांपूर्वी घडलेले एक जुने प्रकरण असल्याचे समोर येत आहे. तितूर नदीपात्रातील पुलाजवळ सोमा चौधरीच्या एका मित्राची पानटपरी पालिकेने अतिक्रमण म्हणून काढली होती. या कारवाईचा राग मनात धरून सोमा उर्फ सागर दगडू चौधरी (रा. चौधरीवाडा) आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
शस्त्रसाठा जप्त
दरम्यान, पोलिसांना गिरणा नदीपात्रात काही तीक्ष्ण हत्यारं आढळून आली आहेत. ही हत्यारं प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरल्याचा संशय आहे. मेहुंबरे पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील नदीपात्रातून दोन कोयते व दोन तलवारी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी, पोलिसांनी सोमा चौधरीसह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.