जळगाव : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने जळगावात महायुतीने भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. या मेळाव्यासाठी तिघेही जळगाव विमानतळावर दाखल झाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांची चार वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती समजते.
advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाल्यानंतर तिथून मेळाव्याच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यातील चार वाहनं एकमेकांवर आदळली. जळगाव विमानतळावरून मेळाव्याच्या ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवित हानी किंवा गंभीर जखमी झालेलं नाही.
ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळल्यानं गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघातानंतर काही वेळाताच मुख्यमंत्र्यांचा ताफा सभेच्या ठिकाणी रवाना झाला. वाहनांच्या ताफ्यातील इतर वाहनांमधून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सभास्थळी दाखल झाले.
फडणवीसांच्या सुरक्षेत रविवारी मोठी चूक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची मोठी चूक समोर आली होती. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरीही फडणवीस यांच्या सुरक्षा यंत्रणेचा पोलिसांचा ताफा मागेच राहिला होता. देवेंद्र फडणवीस पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात जातील असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं. पण फडणवीस यांची गाडी मुख्य महामार्गावर पोहोचले तरी सुरक्षा य़ंत्रणेचा ताफा मागेच राहिला होता.
